जनशक्ती, वृत्तसेवा- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत. सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची मागणी ते लोक करत आहेत. लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केलाय. नगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, शेवगाव तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्यासोबत मी काम केले. ही देशाची निवडणूक आहे, त्यामुळे महाराष्ट्रने यात विचारपूर्वक भूमिका घेणे गरजेचे आहे.
सध्या शेती आणि शेतीशी निगडित कोणताही धंदा घ्या, पूर्वी त्यात उत्पन्न चांगले मिळत होते, पण या केंद्र सरकारने त्यावर बंदी घातली. गुजरातच्या शेतकऱ्यांचा पांढरा कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला, मग आमच्या महाराष्ट्रतील शेतकऱ्यांनी काय घोड मारलं, असे निशाणा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कांदा निर्यात धोरणावरून साधला. आम्ही अनेकदा सरकारकडे मागणी केली. तेव्हा या आठवड्यात केंद्र सरकारने काही निर्णय घेतले. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. देशाची सत्ता 10 वर्षांपासून मोदींच्या हातात आहे. काय झालं 10 वर्षात? नोटबंदी करून देशाला काय मिळालं? मोदी म्हणाले होते नोट बंदीमुळे काळा पैसा बाहेर निघेल पण काहीही झालं नाही, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
कोरोना काळात निलेश लंके स्वतःच्या घरी देखील गेला नाही. कोरोना काळात संकटात असलेल्या लोकांसाठी केंद्र
सरकार कामी आलं नाही. त्या काळात निलेश लंके यांनी लोकांसाठी काम केलं. लोकांच्या कामी न येणाऱ्या केंद्र सरकारवर कसा विश्वास ठेवावा. झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना मोदी सरकारने अटक केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारने अटक केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. ही कोणती पद्धत आहे. यावरून तुम्ही देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न तुमचा असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारवर एखाद्या व्यक्तीने टीका केली तर त्याला थेट जेल मध्ये टाकायचे ही कोणती पद्धत? असा सवाल शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला आहे.
