देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम यशस्वी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिसर भेट उपक्रम घेण्यात आला. शाळेच्या परिसरातील बालाजी सुपर शाॅपी येथे परिसर भेट देण्यात आली. यावेळी आदिनाथ मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, माॅलमधील विविध वस्तू, त्यांचे उपयोग, सफरचंद लागवड, पपई लागवड, माॅरिशस शेती व पर्यटन प्रसंग वर्णन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन खाऊ वाटप केला.
विद्यार्थ्यांनी माॅलमध्ये प्रत्यक्ष खरेदीचा आनंद लुटला. इयत्ता पाहिलीतील विद्यार्थिनी विद्या मुंगसे हिच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी अभ्यासाबरोबरच बाहेरील जगातील घडामोडी, व्यवहारज्ञान विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषाशैलीत समजावून सांगितले. चार भिंतीच्या बाहेरील व्यावहारिक ज्ञानाची शाळा विद्यार्थ्यांना चांगलीच आवडली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालगीतांचा आनंद घेतला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, प्रगतशील शेतकरी जनार्धन मुंगसे, पारुबाई मुंगसे आदी पालकांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता चिलका व आभार सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी मानले. शाळेतील विविध उपक्रमाला गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्ताराधिकारी मिरा केदार, केंद्रप्रमुख कमल लाटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.