माका महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मंकावती देवी यात्रेनंतर माका येथील मंकावती देवी मंदिर परिसरासह सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात एनएसएसचे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांनी मंदिर परिसर, गावातील विविध सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली. यात्रेनंतर साचलेला कचरा गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्यामुळे परिसर स्वच्छ व सुशोभित झाला. स्वच्छतेसह गावात जनजागृती निर्माण करणे व सामाजिक बांधिलकी जपणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाचे ग्रामस्थ व भाविकांनी कौतुक केले. यामुळे मंदिर परिसर प्रसन्न व स्वच्छ झाला असून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचा आदर्श उभा केला आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दराडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निखिल निपुंगे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल दरंदले आणि प्रा. भक्ती बजांगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आले.