जनसामान्यांना न्याय देण्याचं काम पत्रकार करतात: आमदार लंघे पाटील

आपला जिल्हा

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- जनसामान्यांना न्याय देण्याचं काम लेखणीतून पत्रकार करतोय. पत्रकार बांधवांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना लेखणीच्या माध्यमातून तालुक्यात कार्यरत ठेवलं. आमच्या कार्यास समाजासमोर नेले आणि म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते शून्यातून विधानसभेत गेले, यामध्ये तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.
नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथील श्रीराम साधना आश्रमात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम साधना आश्रमाचे संस्थापक महंत सुनिलगिरी महाराज होते. यावेळी व्यासपिठावर मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, नेवासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, साध्वी सुवर्णानंदगिरी चैतन्य, माजी सरपंच दादा निपुंगे, नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार, ॲड. अशोक कर्डक, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.

एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी महंत सुनिलगिरी महाराज व प्रमुख अतिथींच्या हस्ते दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आमदार लंघे पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी सुविधा नव्हत्या, कुठे काय घटना घडली ती वर्तमानपत्रातून समजायाची. ग्रामीण भागात एस टी बसने पेपर यायचे त्यानंतर जिल्ह्यामध्ये, तालुक्यात काय घडलं हे सर्व कळायचे त्यामुळे वृत्तपत्र वाचण्याची सवय नागरिकांना होती. कुठल्याही प्रकारची सत्ता साधन नसताना निर्भीडपणे लिखाण करणे ही पत्रकारांची खरी खासियत आहे. सर्व सामान्य जनतेबरोबर लोकशाहीचे तिनही स्तंभाला चौथा स्तंभ म्हणजेच लोकशाही मध्ये पत्रकार न्याय मिळवून देवू म्हणूनचं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे. पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आमदार लंघे यांनी दिल्या.
महंत सुनिलगिरी महाराज म्हणाले की, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतून सुरू केलेले पहिले वृत्तपत्र दर्पण होते. त्यानंतर कालानुरूप बदल होऊन आता इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे वेगवान झाली आहेत. तरी छपाई होत असलेल्या वृत्तपत्राचा ठसा समाज मनावर कायम आहे. मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,साध्वी सुवर्णानंदगिरी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
उत्कृष्ट व परखड पत्रकारितेच्या माध्यमातून शनिशिंगणापूर देवस्थान मधील विविध गैर प्रकारावर केलेल्या लिखाणाबद्दल प्रवीण तिरोडकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नेवासा तालुक्यातील पत्रकार अशोक पेहरकर, चंद्रकांत दरंदले, कारभारी गरड, राजेंद्र वाघमारे, अशोक तुवर, दिलीप शिंदे, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, दत्तात्रय भिंगारे, मंगेश निकम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अशोक भुसारी, देवीदास चौरे, कैलास शिंदे, दादा निकम, सुधाकर होंडे, आदीनाथ म्हस्के, संतोष टेमक, इस्माईल शेख, सुनिल पंडीत, युसुफभाई सय्यद, इंनुस पठाण, सतिश उदावंत, बाळासाहेब पंडीत बाळासाहेब देवखिळे नामदेव शिंदे, सोमनाथ कचरे आदिंसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. संदीप गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.