जनशक्ती (वृत्तसेवा)- अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदीपात्रात बुडून मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोट प्रवरा नदीपात्रात पलटल्यानं या बोटीतील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, सागर पोपट जेडगुले, (वय २५, रा.धुळवड, ता. सिन्नर ) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय १८, रा. पेमगिरी ता. संगमनेर) हे दोघे प्रवरा नदीपात्रातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही बुडाले. त्यातील सागर जेडगुलेचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी ‘एसडीआरएफ’च्या टीमला मुंबईहून पाचारण करण्यात आल होत. मात्र, यावेळी दुर्दैवानं एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली. यात पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झालाय. प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा अशी मृत जवानांची नावं आहेत. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी ६ वाजता एसडीआरएफचे पथक गावात आले. साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी शोधमोहीम सुरू केली. एसडीआरएफ टीमच्या दोन बोटी तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण यातील एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडली. काही क्षणातच ही बोट उलटली. दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता आलं नाही. दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले, अशी माहिती पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी दिली.
