जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल झालेल्या तुफानी पर्जन्यवृष्टीने धरणाकडे झपाट्याने पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणसाठा ४१ टक्क्यांवर पोहचला असून येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के भरण्याची शक्यता आहे. दोन दिवसात धरण भरणार आज सकाळी दहा वाजता कोतुळ कडील मुळा नदीतून मुळा धरणाकडे सव्वाचार मीटरला तब्बल १६ हजार ७५० क्युसेक वेगाने आवक सुरू होती. दुपारी सव्वाबारा वाजता ही आवक २४४५२ क्युसेक इतकी वाढली. या हंगामातील ही सर्वाधिक आवक आहे. मागील ४८ तासात मुळा धरणात ९२२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार हजेरी लावली आहे. हरिश्चंद्रगडाकडील पाणलोटात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुळा धरण साठा आज सकाळी दहा हजार ६३६ दशलक्ष फुटावर ( ४१ टक्के) पोहोचला आहे. तर पाण्याची पातळी १ हजार ७७७.२० इतकी झाली. गेल्या २४ तासात धरणात तब्बल पाऊण टीएमसी पाणी जमा झाले. सकाळी कोतुळ येथून लहित खुर्द येथील जलमापन केंद्रावर धरणाकडे दहा हजार ३४२ क्युसेकने सुरू होती. त्यात सकाळी दहा वाजता आणखी वाढ होत १६ हजार ७५० क्युसेक इतकी सुरू होती . दुपारी १२.१५वाजता पाण्याची आवक २४४५२क्युसेक होती. ही आवक पाहता मुळा धरण दोन दिवसात निम्मे भरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
