बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील राजा वीरभद्र (बिरोबा) देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी यात्रेच्या आदल्या दिवशी गंगेचे पाणी कावडीने आणून बिरोबा देवस्थानला स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी कबीरपंथी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यात्रेच्या दिवशी सकाळपासून महाराष्ट्रातून भक्तगण दर्शनासाठी आले होते. या निमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून अख्यायिका असल्याने महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.
यावेळी आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सुनिताताई गडाख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक गजढोल, गजनृत्य व डफाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रेच्या दिवशी दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बनसोडे, नजन व पंडित या परिवाराने विशेष परिश्रम घेतले.