जनशक्ती (वृत्तसेवा)- देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी देशाचा विकास, कायदे आणि नियमांतील बदल यावर भाष्य केलं.
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
तसेच, वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली. बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर कोलकात्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
देशात आगामी ५ वर्षांमध्ये ७५ हजार वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर, राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका मोदींनी मांडली.
या देशानं असाही काळ पाहिलाय जेव्हा होईल, केलं जाईल, हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे, पुढची पिढी पाहून घेईल, आपल्याला संधी मिळाली आहे मजा करून घ्या, पुढचा येईल तो बघून घेईल असे विचार होते. कुणास ठाऊक का पण देशात जैसे थे परिस्थितीचं वातावरण बदललं होतं. लोक म्हणायचे सोडा, आता काही होणार नाहीये. असंच चालणार असं म्हणायचे. आम्हाला या मानसिकतेला छेद द्यायचा होता. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. देशातला सामान्य नागरिक बदलाच्या प्रतीक्षेत होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे तो संकटांचा सामना करून गुजराण करत राहिला. आम्हाला जबाबदारी दिली गेली आणि आम्ही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. गरीब, मध्यम वर्ग, वंचित वर्ग, शहरी नागरीक, तरुणांच्या आकांक्षा यामध्ये बदल आणण्याचा मार्ग आम्ही निवडला. सुधारणा करण्याचा मार्ग निवडला.
सुधारणेसाठीची आमची बांधिलकी पिंक पेपरच्या संपादकीयापर्यंत मर्यादित नाही. ती ४ दिवसांच्या कौतुकासाठी नाही. कुठल्या नाईलाजामुळे नाहीये. देशाला मजबुती देण्याच्या निश्चयाने आहे. आपला सुधारणांचा मार्ग एक प्रकारे विकासाची ब्लू प्रिंट झाला आहे. या आमच्या सुधारणा तज्ज्ञांसाठी फक्त चर्चेचा विषय नाही. आम्ही राजकीय नाईलाजाने सुधारणा केलेल्या नाहीत. आम्ही राजकीय गुणाकार-भागाकाराचा विचार करत नाही. आमचा एकच संकल्प आहे, राष्ट्र प्रथम. त्याच आधारावर आम्ही निर्णय घेतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.