बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती या शाळेमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थांनी शाळा परिसरातील झाडे व पुस्तकांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. आर. कचरे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. जी. नांगरे सर यांनी केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक नांगरे सर यांनी मुलांना राणी पद्मावतीची गोष्ट सांगून रक्षाबंधन सणाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी मुलींनी मुलांसह, शाळा परिसरातील झाडे व पुस्तकांचे औक्षण करून राखी बांधली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कचरे सर यांनी सांगितले की, जशी झाडे जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात तशीच पुस्तकेही आपल्याला आवश्यक आहेत व ते आपले संरक्षण करून भावी जीवनासाठी मार्गदर्शक असतात.
आपण चांगले जीवन जगताना झाडावर, पुस्तकावर प्रेम केले पाहिजे. झाडे व पुस्तके भावाप्रमाणे आपले संरक्षण करतात, असे मार्गदर्शन यावेळी कचरे सर यांनी केले.
