अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा: सुनिलगिरीजी महाराज

ब्रेकिंग न्यूज

कुकाणा (प्रतिनिधी) – कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेमध्ये विज्ञान धरलेले आहे. परंतु आज समाजात मोबाईलवर कोणीही काहीही पोस्ट टाकतात आणि त्याचा दुष्परिणाम होऊन लोकांमध्ये वैरभाव निर्माण होतो. हे सर्व आता थांबले पाहिजे व समाजात, देशात शांतता निर्माण झाली पाहिजे. आध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन श्रीराम साधना आश्रमचे महंत सुनिलगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित ज्ञानसरिता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक व विचारवंत सुभाष सोनवणे होते. पाहुण्यांचे स्वागत व पुरस्कारार्थींचा परिचय प्रतिष्ठानचे सचिव प्रा. सुनिल पंडित यांनी तर प्रस्ताविक उपाध्यक्ष डॉ. प्रा. संतोष तागड यांनी केले.
या प्रतिष्ठाणने गेल्या अकरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना ज्ञानसरिता पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरु केला, या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ आहे. या पुरस्कारांचा वितरण सोहळा श्रीराम साधना आश्रम मुकींदपूर (नेवासा फाटा ) येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.
या पुरस्काराचे मानकरी पत्रकार सुदाम देशमुख (आदर्श पत्रकारिता), श्रीमती. विद्या जोशी ( अहमदनगर कला भूषण ) मनिषा धानापुणे ( क्रीडारत्न), श्रीमती अरिफा मिराबक्ष शेख ( साहित्यरत्न), सरपंच पुजा आघाव (आदर्श सरपंच), स्नेहल संतोष भालेराव (उत्कृष्ट अभियंता, अहमदनगर) महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत (समाजभूषण), प्रा. सागर बनसोडे ( शिक्षकरत्न), काकासाहेब फोलाणे (योगगुरु, समाजकार्य ) अतुल तांबे (कृषीरत्न, तांबेवाडी) शंकरराव कन्हेरकर (वृक्षमित्र, समाजरत्न), अनिल चिंधे ( उत्कृष्ट साहित्य लेखन, माळी चिंचोरा) व चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत यांना विशेष गौरव पुरस्काराने व निबंध लेखन स्पर्धेत अश्विनी धुमाळ व साधना कुकडे यांना महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत सुभाष सोनवणे, ॲड. हिंमतसिंह देशमुख, युवा नेते अब्दुलभाई शेख,  प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त चष्माघरचे संचालक अशोक पाटील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक व विचारवंत सुभाष सोनवणे म्हणाले, मानवता संवर्धन, निसर्ग संवर्धन, जेष्ठ नागरिकांचे, माय-बाप,खळखळणाऱ्या नद्यांचे व मातृभाषा मराठीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. आणि ह्या अनुषंगाने काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच हे प्रश्न आपल्या साहित्यातून लिखाणातून समाजापर्यंत पोहचवणाऱ्या लेखकांनाही “युवा बहुउदेशीय प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. हा अतिशय स्तुत्य व गौरवास्पद उपक्रम आहे.

यावेळी प्रा. अनिल गर्जे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश सदस्य विकास मदने, शहर अध्यक्ष नंदकुमार मोरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, मुख्याध्यापक कैलास धानापुने, धोंडाबाई कांबळे, सुभद्रा पठारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर निलेश पठारे, दत्तात्रय कोकरे, रविंद्र कांबळे, अश्विनी थोरात यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. युन्नुस पठाण यांनी सुत्रसंचालन तर भिवाजी आघाव यांनी आभार मानले.