बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने शांतीब्रह्म , गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली होती. दररोज नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. तसेच विजयादशमी दसरा निमित्त श्री बालाजी पालखी मिरवणूक रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली. या मिरवणुकीत परिसरातील नामांकित टाळकरी यांनी हजेरी लावत हरिनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. तर अहिल्याबाई होळकर शाळेतील लेझीम पथक, ओन्ली साई ग्रुप लेझीम पथक ,जय भवानी युवा मंच लेझीम पथक यांनी आपली नृत्य व लेझीम सादर केली. तसेच धनगर समाजाच्या वतीने गजनृत्य व गजढोल याचेही आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक फटाक्याच्या आतिशबाजी मध्ये व पारंपारिक नृत्याच्या वाद्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मिरवणुकीसाठी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने उपस्थित होते.
तर १७ ऑक्टोबरपासून यात्रा उत्सवात सुरू झाली होती. यात्रेमध्ये मेव्याची दुकाने, लहान मुलांचे खेळण्याची दुकाने, जम्पिंग उड्या ,मिकी माऊस, महिलांच्या सौंदर्यप्रसाधनाची दुकाने, विविध घरगुती वस्तूचे दुकाने असे अनेक स्टॉल यात्रा उत्सव निमित्ताने लागली होती. यामध्ये देडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेऊन भरपूर खरेदी करत यात्रेचा आनंद घेतला. यात्रा उत्सव निमित्ताने बालाजी देवस्थानला महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी आले होते. सप्ताह काळात दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १८ रोजी सकाळी ९ वाजता हजऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर हगाम्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लाने हजेरी लावली होती. पाच हजार रुपयाची शेवटची कुस्ती लावून हगाम्याची सांगता करण्यात आली.
शनिवारी हभप गुरुवर्य प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या तीर्थप्रसादाच्या कीर्तनाने यात्रा उत्सवाची सांगता झाली.
अखंड हरीनाम सप्ताह व यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बालाजी देवस्थान ट्रस्ट, बालाजी यात्रा कमिटी, बालाजी भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ यांनी विशेष कष्ट घेत सहकार्य केले.