जनशक्ती (वृत्तसेवा)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड यांचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
यावेळी वाल्मिक कराड म्हणाले, केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 23 दिवस होत आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर वारंवार आरोप होत असलेले तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघा विरोधात गुन्हा दाखल झाला.
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंचाचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली. मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले. 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली. 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराड यांच्यावर आरोप केले. तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी अका असतील, त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली. 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. तर त्याच 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली. 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. 19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला.. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या.. आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.. 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली.. आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला..
21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तर 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. 28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मीक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला. आतापर्यंत या प्रकरणात सीआयडीने जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी केली आहे. यात वाल्मीक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. ज्याचा तपास सध्या सीआयडी करत आहे.
