जनशक्ती (वृत्तसेवा)- केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नगर शहरातील कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.
या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. रामदास तडस, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुणकाका जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव दगडे, सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
