जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं दिसत आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ३५ ते ४० अंशावर पोहचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर काही भागात ४२ ते ४३ अंशापर्यंत तापमान वाढलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, चंद्रपुरात ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्याशिवाय परभणी जिल्ह्यातील तापमानातही वाढ झाली आहे. परभणीत आज ४१.०३ अंश पार होता.गुजरात आणि उत्तर-पश्चिम भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची लाट पसरत आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक आर. बालासुब्रह्मण्यन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील तापमान सामान्यापेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने जास्त आहे, आणि काही ठिकाणी ते ४५ अंशांवर पोहोचू शकते. अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा परिणाम अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १० ते १२ एप्रिलदरम्यान दक्षिण-पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढत असून, कोकण, मुंबई, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही शहरांतही ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. काही भागांमध्ये गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना आणि अलर्टकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
