मंत्री, आमदारांनी विचार करुन बोला; मुख्यमंत्र्यांनी सुनावले 

ब्रेकिंग न्यूज

जनशक्ती (वृत्तसेवा)- आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया देत आमदारांना दम दिला आहे. प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले.
आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवर एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद या बैठकीत दिसून आले. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून बोला. वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांना फायदा होत आहे. त्यामुळे सर्वांनी विचार करुन बोलावे. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीणबाबत बोलताना अपप्रचार होईल, असे विधान करू नका.
एकनाथ शिंदे म्हणाले की, रवी राणा यांच्यासारखे आमदार ज्याप्रकारे भाष्य करतात ते चुकीचे आहे. लोकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या आमदारांना वेळीच तंबी द्या. लाडकी बहीण योजनेबाबत चांगला प्रचार करा, असं ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांना असे वक्तव्य करण्यावर आळा घालण्याचे आवाहन केले आहे.