प्रधानमंत्री आवास योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा: सरपंच चंद्रकांत मुंगसे

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत देडगाव येथील ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्या लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा दोन) अंतर्गत ग्रामपंचायत देडगावच्या वतीने ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभागृह आणि शाळेच्या इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डवर दाखवण्यात आले, यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे बोलत होते.
कार्यक्रमास ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यकारी मंडळासह उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, शरद तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, नोडल अधिकारी भोसले सर आणि पदनिर्देशित अधिकारी सावंत सर यांनीही उपस्थिती दर्शवली. गेल्या काही वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देडगाव येथे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना घरकुल यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यंदा ८८ नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आल्याने अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेंतर्गत गरजू कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थ, लाभार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के, किरण मुंगसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.