बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बालाजी देडगाव येथे काल सायंकाळी पाच वाजेनंतर सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू या रब्बी पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. या घटनेनंतर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी देडगाव येथे भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार लंघे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या अवकाळी पावसात वीज पडून सोनाली राजू वाहूरवाघ यांची दुधाळ म्हैस ठार झाली आहे. तर ज्ञानदेव रक्ताटे यांच्याही घराची पडझड झाली आहे. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. आज सकाळी कामगार तलाठी बालाजी मलदोडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, पोलीस पाटील प्रकाश ससाणे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिंदे, डॉ. खामकर, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, गणेश भाऊसाहेब तांबे, देविदास भानुदास पंडित, दादासाहेब वाहूरवाघ, सुखदेव वाहूरवाघ आदींच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती समजताच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धीर दिला. यावेळी बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, निलेश कोकरे, ग्रामविकास अधिकारी एस. जी. उल्हारे, भारत कोकरे, फकीरचंद हिवाळे, कृषी अधिकारी काळे आदी उपस्थित होते.
