जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यासह राज्यभरात विस्तार असेलेल्या त्रिमुर्ती शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी घाडगे पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घाडगे पाटील यांनी शासनाच्या राज्य परिवहन महामंडळ, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी, भारतीय सैन्यदल, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त आदी प्रशासकीय पदांवर काम केले आहे.
साहेबरावजी घाडगे पाटील आपल्या संस्थेच्या कामानिमित्त मंगळवारी (ता.१०) मुंबईला मंत्रालयात गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. घाडगे पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
घाडगे पाटील यांच्या पार्थिवावर आज (दि. ११) सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती संकुलात अंत्यसंकार होणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुली, जावई, पुतणे असा परिवार आहे.
