बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने गुरुवर्य हभप स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली. यावेळी महाराजांनी संताविषयी माहिती देत असताना संत सावता महाराज यांनी कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी असे म्हणत कर्म करत असतांना भक्ती कशी करावी, याचे उदाहरण दिल्याचे सांगितले. तसेच गुरुवर्य, शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज त्याग, वैराग्यमूर्ती, स्वच्छ ,सुंदर, पवित्र जीवन कसे जगले व राष्ट्रासाठी, धर्मासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केले व देवगड सारख्या ठिकाणी नंदनवन केले, अशा अनेक मौलिक शब्दांमध्ये कार्याचा गौरव केला. संतांची सेवा करत असताना किती सहनशीलता असावी लागते, किती त्याग करावा लागतो, याविषयी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी मार्गदर्शन केले. भगवंतांनी ज्याच्या करता जीवन दिले, ती भक्ती झाली नाही तर जीवन अधुरे राहते, असे स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज म्हणाले. तर शेवट कीर्तनाचा सार म्हणून चांगलं करत रहा, फळाची अपेक्षा करू नका, चांगलं केल्यानंतर चांगलंच होईल. म्हणजेच जैसी करनी, वैसा फल, आज नही तो निश्चित कल या उक्तीप्रमाणे जीवन जगा, जीवनात कमी पडणार नाही, असे महाराज म्हणाले. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने दररोज नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडत आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन रुपीसेवा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी संत सावता ग्रुप, तांबे परिवार, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
