अक्षय केकाण यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ज्ञानकार्तिका संस्थेचे अध्यक्ष अक्षय केकाण यांना दैवत फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश तर्फे ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ३ ऑगस्ट रोजी शेवगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशन, पदाधिकारी मेळावा तथा समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ या कार्यक्रमात आनंदग्राम (इनफॅण्ट इंडिया), पाली (जि. बीड) संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अक्षय केकाण हे व्यवसायाने अभियंता असून सध्या आयसर्टिस सोल्यूशन्स या बहुराष्ट्रीय कंपनीत कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एमआयटी, पुणे येथून अभियांत्रिकीची पदवी व इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे येथून एम.बी.ए. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे वडील डॉ. विष्णू केकाण हे व्यवसायाने डॉक्टर असून, बालपणापासूनच समाजसेवेची प्रेरणा लाभलेल्या केकाण यांनी कोविड-१९ च्या कठीण काळात “ज्ञानकार्तिका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था” (माका) ची स्थापना केली. तसेच, महालक्ष्मी हिवरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत व शांत अभ्यासाची जागा, स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकसंग्रह आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध झाले.
त्यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानकार्तिका संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, त्यामध्ये – गरजू विद्यार्थ्यांना ११०० शालेय कीटचे वितरण,
गोशाळा आणि आपत्कालीन निधी उपक्रम, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधन. सततच्या सामाजिक कार्याबद्दल केकाण यांच्या कार्याची दखल घेत दैवत फाउंडेशनने त्यांना “समाजरत्न पुरस्कार” देऊन गौरविले.
याप्रसंगी अरुणभाऊ मुंढे (महाराष्ट्र प्रदेश चिटणीस – भाजप), डॉ. सुनील कायंदे (प्रदेश उपाध्यक्ष – भाजप ओबीसी), भीमराव फुडे (प्रसिद्ध उद्योजक), गोकुळभाऊ दौंड (मा. सभापती पंचायत समिती पाथर्डी), परम जवरे (दैवत फाउंडेशन अध्यक्ष), अविनाश बुधवंत (डीवायएसपी), राजू पालवे (माजी सरपंच महालक्ष्मी हिवरे) आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल केकाण यांनी दैवत फाउंडेशनचे आभार मानले व पुढील काळात समाजसेवेचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याची ग्वाही दिली.