आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा- समाधान महाराज शर्मा

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा असून यातून मिळणारे पुण्य हे सर्व पुण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी केले. बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे स्व. आसराबाई रायभान तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा (रामकृष्ण परमहंस, केज) यांच्या सुमधुर व भक्तिपर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी श्रोत्यांनी अध्यात्मिक मार्गदर्शन करताना समाधान महाराज शर्मा बोलत होते. यावेळी बोलताना समाधान महाराज शर्मा म्हणाले की, आई-वडील हे जीवनाचे खरे शिल्पकार असतात. त्यांच्यापासून मिळणारे ज्ञान हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. आपण आपल्या आयुष्यात आई-वडिलांची सेवा केली तर ते खूप मोठे पुण्यकर्म ठरते. आई-वडिलांची सेवा करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा खरा कर्तुत्ववान ठरतो, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी यावेळी केले.

याप्रसंगी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशनंदगिरीजी महाराज, हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सुभाष महाराज औटी, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संचालक प्रा. नारायणराव म्हस्के सर आदींनी स्व. आसराबाई तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी विविध महंत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी दत्तात्रय तांबे व हरिभाऊ तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.