कोकरे वस्ती येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कोकरे वस्ती येथे बाबीरबाबांच्या कृपा अशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांचे प्रेरणेने हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ अध्याय गीता पारायण सोहळा उत्साहात पार पडला. हभप महंत भागवताचार्य सुदर्शनजी महाराज उदासिन (सुदर्शन आश्रम, शिंदेवाडी) यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
या अखंड हरिनाम सप्ताहास संत, महंत व मान्यवरांनी भेट देत या सोहळ्याचा लाभ घेतला. या सप्ताहकाळात पहाटे ४ ते ५ काकडा, ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ५ ते ६ हरीपाठ, रात्री ७ ते ९ हरीकिर्तन व नंतर जागर अशा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या सप्ताह काळात हभप सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), हभप बाळकृष्ण महाराज रिंधे (जेऊर हैबती), हभप निलेशजी महाराज वाणी (वैष्णव आश्रम, बन्हाणपूर), हभप सचिन महाराज पवार (श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर, श्रीक्षेत्र नेवासा) यांच्या किर्तनसेवा संपन्न झाल्या. आज सकाळी ९ ते ११ हभप महंत भागवताचार्य सुदर्शनजी महाराज उदासिन (सुदर्शन आश्रम, शिंदेवाडी) यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद झाला.