कुकाणा (प्रतिनिधी)- बहिणींची सुरक्षा म्हणजे केवळ वाईट प्रवृत्तीपासून बहिणीचे संरक्षणच नव्हे तर आताच्या परिस्थितीत सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूकीपासूनही बहिणींना वाचवण्याची गरज आहे. रक्षण करण्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा धागा आपुलकीचे मजबूत बंधन बनून राहिलेला आहे, असे प्रतिपादन कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी केले. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील श्रीराम विद्यालयात विद्यार्थीनींनी पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन उपक्रम संपन्न झाला.
उपनिरीक्षक अहिरे यावेळी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विद्यार्थी तुकडीने मानवंदना दिली. देवगाव सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष कचरदास गुंदेचा, प्राचार्य सोपानराव सतरकर, हवालदार जालिंदर वाघ, दिलीप घोळवे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रा.बाळासाहेब भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपनिरीक्षक अहिरे यावेळी भावुक झाले. ते म्हणाले गेल्या आठ वर्षात नोकरीतील कामाच्या व्यापाने गेल्या आठ वर्षात रक्षाबंधनाला घरी जाता आले नाही. विद्यार्थीनिनींचा असा उपक्रम कौतुकास्पद आहे.
रक्षाबंधनाने नात्यांची उब, जिव्हाळा आणि आपुलकी अशीच टिकून राहणार आहे. सीमेवरील सैनिक बांधवाना काही संस्था, महिला अशाच उपक्रमातून आवर्जून राख्या पाठवत असतात. जवानांच्या मनगटावरची अशी राखी त्यांना बळ देत असते. तुमच्या अशाच राख्यांनी आमच्याही मनगटात बळ देत राहणार आहे.
यावेळी हवालदार दिलीप घोळवे यांनी डायल 112 यावर मार्गदर्शन केले. अडचण, संकट काळात अशी तत्पर सेवा असून पोलिसांना न घाबरता यावर फोन करा. नैसर्गिक संकट असेल तरीही बिनधास्त फोन करा, असे आवाहन करून हा क्रमांक विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगितले. कचरदास गुंदेचा, शिक्षक संजय शेळके यांनीही रक्षाबंधनाचे महत्व व इतिहास सांगितला. भरतसिंग परदेशी यांनी सूत्रसंचालन केले तर सिकंदर शेख यांनी आभार मानले.