बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मंगळवारी (दि.७ ऑक्टोबर) श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तर विजयादशमी व दसरानिमित्त श्री बालाजीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर मंगळवारी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी पहाटे बालाजी पालखी मिरवणूक होणार आहे. तर सायंकाळी शोभेची दारू व छबीना मिरवणूक होणार आहे.
बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी कलावंताच्या हजेऱ्या व दुपारी चार वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा हगामा होईल. तर तर गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप सोपान काका पाहणे महाराज (श्रीक्षेत्र आळंदी) यांच्या काल्याचे कीर्तनाने यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. येथील बालाजी देवस्थान ट्रस्ट, गावकरी व दानशूर व्यक्तींच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. तरी या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी देवस्थान ट्रस्ट, बालाजी यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांनी केले आहे.
