बालाजी देडगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक पाळीव प्राण्यांची शिकार या बिबट्याने केली आहे. तसेच अनेकांना या बिबट्याचे मुक्त संचार करताना दर्शन झाले आहे. गावालगत असलेल्या अरुण वांढेकर यांच्या घरासमोर बांधलेल्या बोकडाचा या बिबट्याने आज (ता.८) पहाटे फडशा पाडला. या अगोदर प्रेमचंद हिवाळे यांच्या कुत्र्याचाही या बिबट्याने फडशा पाडला होता. तसेच येथील शांताराम बावधनकर यांनी या बिबट्याला समक्ष पाहिले आहे. गावालगत असलेल्या अरुण वांढेकर यांच्या वस्ती शेजारी दोन गायी, दोन शेळ्या व बोकड बांधलेले होते. आज पहाटे सगळे उठल्यानंतर येथील बोकडाचा बिबट्याने फडशा पाडल्याचे लक्षात आले. त्यानंतर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी याबाबत वन खात्याला कळवल्यानंतर वन कर्मचारी सयाजी मोरे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खामकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी पत्रकार बन्सीभाऊ एडके, संजयकुमार लाड, राजू कदम, हरिभाऊ देशमुख, गोकुळ वांढेकर, नामदेव वांढेकर, बाबासाहेब वांढेकर आदी पंचनामास्थळी उपस्थित होते. तरी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.