जनशक्ती (वृत्तसेवा)- आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे. सिकंदरचा सहभाग आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मोहाली पोलिसांच्या सीआयए (CIA) पथकाने आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चार सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख याचा समावेश आहे. ही टोळी शस्त्र तस्करी, खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे. सिकंदर शेखच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबाने मात्र या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना “खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात आहे” असा आरोप केला आहे. सिकंदरच्या अटकेमुळे राज्याच्या कुस्ती क्षेत्रात तीव्र चर्चांना उधाण आले आहे.
					
