कुकाणा येथे २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा तसेच लाडक्या बहिणींसाठी शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कुकाणा (ता. नेवासा) येथे येत्या २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा आणि विविध शासकीय योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याबद्दल स्थानिक युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा उपक्रम राष्ट्रवादीचे नेते अब्दुल भैया शेख यांच्या सौजन्याने आयोजित होत आहे.
तालुक्यासह परिसरातील सुशिक्षित युवकांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात देशातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या विविध पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियाही याच ठिकाणी पार पडणार आहे. तसेच उपस्थित युवकांना विविध शासकीय योजनांची माहिती कार्ड वाटप, जॉब कार्ड वाटप, आरोग्य कार्ड वाटप वितरण, मोफत KYC, शेती अनुदान तसेच नुकसान भरपाई,डोल व कूपन साठी विशेष टेबल लावण्यात येणार आहे.
भैय्या सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने हा मेळावा साई श्रद्धा लॉन्स, कुकाणा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. अधिकाधिक युवक-युवतींनी व लाडक्या बहिणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी आणि तरुणांना दिशा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.