जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उक्कडगाव येथील शाळेत नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत आठवडच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेचे उद्घाटन विस्तार अधिकारी रवींद्र कापरे साहेब व उक्कडगाव गावचे सरपंच म्हस्के यांच्या हस्ते तर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी उपस्थितांनी व खेळाडूंनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. स्पर्धेमध्ये मोठा व लहान गट मुले व मुली अशा गटांमध्ये कबड्डी, खोखो, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक आदी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये चार प्रकारांमध्ये आठवड शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये १०० मीटर धावणे मुले या गटात आठवड शाळेचा विद्यार्थी संग्राम विकास शिंदे याने प्रथम क्रमांक पटकाविला. या शाळेने घवघवीत यश संपादन करून स्पर्धेवर वर्चस्व राखले. गटशिक्षणाधिकारी कोलते मॅडम, विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, केंद्र प्रमुख संजय धामणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी विजयी खेळाडूंचे व संघांचे अभिनंदन केले. याकरिता परिश्रम व मार्गदर्शन घेणाऱ्या आठवड शाळेतील शिक्षकांचे यावेळी आभार मानून स्वागत करण्यात आले आणि तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



