माका महाविद्यालयाच्या बालाजी देडगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर २०२५–२६ चे उद्घाटन बालाजी मंदिर, देडगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे (विश्वस्त मुळा, एज्युकेशन सोसायटी), सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, संजय मुंगसे हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे सर होते.

उद्घाटन समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर NSS स्वयंसेवकांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निखिल निपुंगे, NSS कार्यक्रम अधिकारी यांनी केले. यानंतर NSS शिबिराची उद्दिष्टे, उपक्रम व सात दिवसांचा आराखडा सादर केला. एन.एस.एस. समन्वयक म्हणाले की, या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती संवेदनशीलता निर्माण होईल आणि ग्रामीण भागातील पडीक जमिनीचे रूपांतर हिरवाईत होईल. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाश्वत विकासासाठी युवक – पाणलोट आणि पडीक व्यवस्थापन या विषयावर आधारित हे शिबिर १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असून विविध सामाजिक, पर्यावरणीय व श्रमाधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी सांगितले की, वाढती पाण्याची टंचाई आणि नापिक होत चाललेली जमीन ही भविष्यातील मोठी संकटे आहेत. NSS स्वयंसेवकांनी आपल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून गावोगावी वैज्ञानिक पद्धतीने जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज आहे. जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “NSS मुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते आणि व्यक्तिमत्व विकास होतो.”
अध्यक्षीय भाषणात बनसोडे सर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी” हे निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. युवकांच्या श्रमातून समाज घडतो, कारण श्रमाचे महत्त्व ओळखणारा युवकच सक्षम आणि सशक्त राष्ट्र घडवतो असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ.अमोल दहातोंडे यांनी केले. पसायदानाने उद्घाटन समारंभाची सांगता झाली. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ . भानुदास चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, NSS स्वयंसेवक-स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.