जिल्हा परिषद शाळेचा तेजस्वी तारा: डॉक्टर कमलेश काळे यांचा गौरव

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर व हनुमाननगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने FMGE परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केलेल्या डॉक्टर कमलेश बाळासाहेब काळे यांचा जाहीर सत्कार माननीय अशोक काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

डॉक्टर कमलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “स्वप्न मोठी ठेवा, पण पाय जमिनीवर ठेवा.” त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नवी उमेद चमकली. यावेळी शुभांगीताई काळे यांनी डॉक्टर कमलेश यांना शुभेच्छा देत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. डॉक्टर कमलेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले असल्याने विद्यार्थ्यांची जडणघडण जिल्हा परिषद शाळेत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळा व मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर कमलेश काळे, तसेच त्यांचे पिताश्री बाळासाहेब काळे व मातोश्री सीता काळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व डॉक्टर कमलेश यांना उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर कमलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले तसेच शाळेसाठी आर्थिक देणगी देऊन भविष्यातही शाळेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या गौरवसोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून, जिल्हा परिषद शाळा म्हणजे गुणवंतांची खाण आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अध्यक्ष भाषणामध्ये अशोक काळे सर यांनी विद्यार्थी उच्च पदावर गेल्यानंतर गुरूंचा अभिमान वाढतो, असे मनोगत व्यक्त केले. तर डॉक्टर कमलेश हा त्यांचा विद्यार्थी असून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुख्याध्यापक लोंढे सर यांनी केले, तर लांघे सर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमास हनुमाननगर मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.