पत्रकारांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी संसदेत आवाज उठविणार- खासदार वाकचौरे

आपला जिल्हा

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा येथील औदुंबर चौकात हॉटेल प्रणामच्या सभागृहात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित मुक्त संवाद सन्मान सोहळयाला उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. यावेळी खासदार वाकचौरे यांनी नेवासा तालुक्यातील पत्रकारांशी मुक्त संवाद साधून केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. पत्रकारांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी मी प्रयत्नशील असून चांगला प्रस्ताव तयार करा त्यासाठी मी संसदेत आवाज उठविणार असून पाठपुरावा करून ज्येष्ठ पत्रकारांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार वाकचौरे यांनी यावेळी बोलतांना दिली.    खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकारांच्या मुक्त संवाद सोहळयाच्या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मुकुंद शिनगर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब तनपुरे, शिव सहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, नेवासा प्रेस क्लबचे मार्गदर्शक पत्रकार अशोक डहाळे, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, शहरप्रमुख नितीन जगताप, पोलीस पाटील सुभाष कडू पाटील, गफूरभाई बागवान, रामभाऊ केंदळे व्यासपीठावर उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित मुक्त संवाद सन्मान सोहळयाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. यावेळी खासदार वाकचौरे यांच्या वतीने स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे सर यांनी आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले.

नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी पत्रकार भवन जागा उपलब्ध करून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, प्रलंबित बेलापूर- परळी रेल्वे सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी प्रास्ताविक करतांना केली. याप्रसंगी तालुक्यातील उपस्थित पत्रकारांचा सन्मान खासदार वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल व डायरी देऊन करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की नेवासा तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून मी काम केलेले असल्याने त्यावेळी तालुक्यात अनेक घरकुले विहिरी व शासकीय योजनांचा मला लाभ देता आला. तालुक्यातील प्रश्नांची मला जाणीव असल्याने खासदार झाल्यानंतर अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि करत आहे. बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी तारांकित प्रश्न संसदेत मांडले. हा प्रश्न तडीस लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील माणसे व त्यांच्या प्रश्नांशी माझी नाळ जुळली असल्याने जास्तीत जास्त निधी देण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पत्रकारांच्या पाठीशी मी सदैव पाठिशी रहाणार आहे. पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करा त्यासाठी निधीची तरतूद मी करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. संत ज्ञानेश्वर महाराज तीर्थक्षेत्र विकास कामांना गती व दिशा कशी मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील असे ही त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचा खासदार असल्याने आतापर्यंत संसदेत ११८ तारांकित प्रश्न मी मांडले. ९ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत मी संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र विकास कामाला गती मिळावी म्हणून बोलणार आहे, पत्रकारांच्या पेन्शन योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी चांगला प्रस्ताव तयार करा मी त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच नेवासा तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देऊन जास्तीत जास्त निधी देण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.
यावेळी झालेल्या पत्रकारांच्या मुक्त संवाद सन्मान सोहळयाच्या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ  पत्रकार बाळासाहेब तनपुरे, पत्रकार अशोकराव डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पेन्शनर संघटनेचे पदाधिकारी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावेळी निवेदन दिली. धार्मिक स्थळांना मंजूर झालेल्या सभामंडपांना त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे यांनी निवेदनाद्वारे केली.
झालेल्या कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील पत्रकार बांधवांसह शेतकरी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे यांनी झालेल्या संवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी उपस्थित पत्रकार, शेतकरी, पेन्शनर, नागरिकांचे आभार मानले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने संवाद मेळाव्याची सांगता करण्यात आली.