बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वै. ह.भ.प. शिवराम महाराज रिंधे, वै.ह.भ.प. गुरुवर्य बन्सी महाराज तांबे (श्री क्षेत्र नेवासा), वै. यादव महाराज म्हस्के, वै. ह.भ.प. रामभाऊ महाराज रिंधे यांच्या कृपाशीर्वादाने, अण्णासाहेब (आबा) मारुतराव म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे ध्वजपूजन गुरुवारी (दि.२) सकाळी ८.३० वाजता महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज, वेदांतचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के (श्री ज्ञानेश्वर रचना स्थान, श्री क्षेत्र नेवासा) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह काळामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन व नंतर भोजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन यामध्ये करण्यात आले आहे.
या सप्ताह काळामध्ये गुरुवारी २ एप्रिल रोजी विनोदाचार्य ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम (सलाबतपूर), शुक्रवारी ३ एप्रिल रोजी भागवताचार्य ह. भ. प. मारुती महाराज झिरपे (चापडगाव), शनिवारी ४ एप्रिल रोजी ह. भ. प. कृष्णा महाराज हारदे (माळेवाडी), रविवारी ५ एप्रिल रोजी ह.भ.प. गोविंद महाराज पवार (आष्टी), सोमवारी ६ एप्रिल रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज शिंदे (खुलताबादकर), मंगळवारी ७ एप्रिल रोजी वेदांतचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र नेवासा), बुधवारी ८ एप्रिल रोजी महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या किर्तनसेवांचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप (संगमेश्वर देवस्थान, सांगवी, आष्टी) यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.

