नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून, तात्काळ मदत द्या: मुंगसे

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सततच्या पावसाने कपाशी, कांदा , तूर , सोयाबिन , मका , पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे बोंड सडली आहेत. त्यातून कोंब निघाले आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केली आहे.
सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच महसूल कर्मचाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, कृषी सहाय्यक दिपक कंकाळ, कामगार तलाठी जाधव व स्थानिक प्रशासकीय कर्मचारी पंचनामे करत आहेत. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करुन घ्यावेत, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले आहे.
या हंगामामध्ये पडलेला पावसाचा खंड व त्यानंतर असलेली अतिवृष्टी आणि रोगाच्या साथी किडीचा प्रादुर्भाव यामुळे हजारो एकर क्षेत्र आधीच बाधित झाले असताना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकाचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. आधीच कांद्याला भाव नाही, आता आहे त्या कांद्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केली आहे.