बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- २७ सप्टेंबरची रात्र व २८ सप्टेंबरची सकाळ नेवासा तालुक्यातील माका येथील कोकाटे कुटुंबासाठी अत्यंत भितीदायक, वाईट अनुभव देणारी व कधीही न विसरू शकणारी ठरली. कारण कोकाटे वस्तीच्या चारही बाजूंनी पाण्याने भरलेल्या शेताकडे पाहिले तर पाण्याची पातळी खूप झपाट्याने वाढतच चाललेली होती. फक्त जीव कसा वाचेल याची संपूर्ण वस्ती चिंतेत होती.
लहान मुले, वयोवृद्ध माणसं सर्वांच्या डोळयांतून पाण्याच्या धारा सुरु होत्या. ही परिस्थिती बघून युवा नेते सहदेव लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपत्कालीन विभागाकडे व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना संपर्क साधून त्यांनी बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी युवा नेते सहदेव लोंढे, प्रविण शिंदे, गोकुळ लोंढे, पोलीस पाटील अशोक वाघमोडे, संभाजी लोंढे, सुभाष गाडे, एकनाथ भुजबळ, बाबा लोंढे, विलास भुजबळ, जगु पटेकर, राहुल लोंढे, सागर भुजबळ, धनंजय भुजबळ, बाबासाहेब भुजबळ, संदीप शिंगटे, अक्षय शिंगटे, पप्पू लोंढे, प्रशांत भुजबळ, संजय कडमिंचे या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर सहदेव लोंढे यांच्या घरी सर्व कोकाटे कुटुंबाची सोय केली. त्यानंतर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहदेव लोंढे यांच्या वस्तीवर कोकाटे कुटुंबियांची भेट घेतला. सहदेव लोंढे व माका येथील तरुणांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.