बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माका येथील जिल्हा परिषदेच्या खेमनर वस्ती नं. १ शाळेतून बदली झाल्याने संदीप भंडारे यांचा निरोप समारंभ तर या शाळेत बदली मिळालेले भाऊसाहेब चांडे यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण लोंढे हे होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तुभाऊ खेमनर, दत्तुभाऊ खताळ, बबनराव तमनर, शंकर खेमनर, गणेश लोंढे, नवनाथ शेंडे आदींनी परिश्रम घेतले. भंडारे सर यांनी या शाळेत आपण केलेले कामकाज संस्मरणीय राहील, अशी भावना व्यक्त केली. तर या शाळेचा गुणवत्ता व भौतिक दृष्टीने आलेख वाढता कसा राहिल याबाबत आम्ही भूमिका बजावणार आहोत, अशी भावना चांडे सर यांनी व्यक्त केली. राहुल पालवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. शेवटी विद्यार्थ्यांना गोड जेवणाची मेजवानी देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
