बालाजी देडगाव येथे उद्या यात्रा; विविध कार्यक्रमांचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या (दि.७ ऑक्टोबर) श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, वै. बन्सी महाराज तांबे यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व हभप स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहकाळात राज्यातील नामवंत किर्तनकारांची किर्तने पार पडली.  या सोहळ्याचे उद्घाटन धर्मध्वजारोहणने झाले. या सप्ताहनिमित्ताने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. या सप्ताह काळात हभप महंत भागवताचार्य सुदर्शनमुनी महाराज उदासिन (सुदर्शन आश्रम शिंदेवाडी), ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज शिंदे (शांतिनिकेतन आश्रम), ह.भ.प. महंत आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड), ह.भ.प. गाथामुर्ती सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज येळीकर (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प. सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव आश्रम, बऱ्हाणपूर), ह.भ.प.महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड) यांच्या किर्तनसेवा पार पडल्या. सोमवारी (दि.०६) सकाळी ९ ते ११ हभप. गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र नेवासा संस्थान) यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तर विजयादशमी व दसरानिमित्त श्री बालाजीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे गावातील प्रत्येक घरासमोर उत्साहात स्वागत करण्यात आले. घरासमोर सडा, रांगोळी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी गावातील परंतू कामानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक गाव येतात. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.  या पालखी सोहळ्यात अनेक पारंपारिक नृत्याचा अविष्कार बघायला मिळाला. तर अश्विन पोर्णिमेनिमित्त उद्या मंगळवारी (दि.७) यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी पहाटे बालाजी पालखी मिरवणूक होणार आहे. तर सायंकाळी शोभेची दारू व छबीना मिरवणूक होणार आहे. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी कलावंताच्या हजेऱ्या व दुपारी चार वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा हगामा होईल. या हगाम्यासाठी राज्यभरातील मल्ल हजेरी लावत असतात. तर  गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप सोपान काका पाहणे महाराज (श्रीक्षेत्र आळंदी) यांच्या काल्याचे कीर्तनाने यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. येथील बालाजी देवस्थान ट्रस्ट,  गावकरी व दानशूर व्यक्तींच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. तरी या यात्रा उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी देवस्थान ट्रस्ट, बालाजी यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांनी केले आहे.