बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाला प्रतिष्ठित समजला जाणारा ‘टॉप स्कूल ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कुशल आणि समर्पित शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांवर भर, विद्यार्थ्यांची सातत्याने उत्कृष्ट प्रगती या कारणांमुळे तक्षशिला विद्यालयाची या पुरस्काराकरिता निवड झाली आहे.
इंडियन स्कूल समिट कार्यक्रमांतर्गत देशभरात घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये तक्षशिला विद्यालयाने सर्व आवश्यक निकष (मानांकने) यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
रोबोचॅम्प्स, रोबोवंडर आणि किड्स इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अकॅडमी या दिल्ली येथील तीन संस्थांनी एकत्रितपणे हा पुरस्कार प्रदान केला.
दिल्ली येथे रोबोचॅम्प संस्थेचे संचालक अभिषेक आहुजा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विजय कदम यांनी विद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रोफेसर डॉ. विजय कदम यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्य मयुरी पवार समन्वयक कल्पना पवार संचालिका शुभांगी कदम आणि सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. “हा पुरस्कार विद्यालयातील कुशल शिक्षक आणि हुशार विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्राप्त झाला आहे,” असे मत प्रा. विजय कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
तक्षशिला विद्यालयाच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल परिसरातील पालक व नागरिक यांचेकडून तक्षशिलाच्या शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

