देडगाव गणाची उमेदवारी आकाश चेडे यांनाच मिळावी; कार्यकर्त्यांकडून मागणी

राजकीय

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून वैयक्तीक गाठी- भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नेवासा तालुक्यातील देडगाव गण हा गट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या गणात नेहमी चुरशीची लढाई झाल्याचा इतिहास आहे. या गणातून भाजप महायुतीकडून भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून  होत आहे. आकाश चेडे मागील १० वर्षांपासून सामाजिक जिवनात सक्रिय आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अनेकदा निवेदने देत तसेच वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करत अनेक कामे त्यांनी मार्गी लावले आहेत. यामध्ये गावातील बस सेवेचे प्रश्न मार्गी लावणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न, गावातील रस्त्यांचे प्रश्न सोडवणे व सभामंडप यासाठी प्रयत्न, वर्ग दोनच्या जमिनीवरील पोटखराबा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांचा देडगाव व परिसरात दांडगा जनसंपर्क असून त्याचाही फायदा त्यांना व पक्षाला या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे देडगाव गणातून भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.