देडगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; सतर्कता बाळगण्याचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांचे आवाहन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनीधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. या बिबट्याचे अनेकांना दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देडगाव व परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले आहे. बालाजी देडगाव व परिसरातील अनेकांचे बोकड व शेळ्या तसेच पाळीव प्राणी या बिबट्याने फस्त केले आहेत. अरुण वांढेकर, बाळासाहेब काजळे, गंगाधर चेडे, मोहन टाके, अशोक कदम, अशोक मुंगसे यांनी दिवसाढवळ्या बिबट्या बघितला आहे. तसेच नवे देडगाव येथे रात्री दहा वाजता अनेकांना बिबट्याने दर्शन दिले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.याबाबत सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी नागरिकांना काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री घराचे दरवाजे बंद ठेवा, टॉर्च वापरा, लहान मुलांना रात्री एकटे बाहेर सोडू नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा, पाळीव प्राण्यांची काळजी घ्या, त्यांना बंदिस्त ठेवा, बिबट्याची हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्या, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले आहे. तसेच बिबट्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी दिवसा वीज मिळावी, अशी मागणी सरपंच चंद्रकांत मुंगसे व ग्रामस्थांनी केली आहे.