बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ निमित्त मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावेडी, अहिल्यानगरचे प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी “मराठी भाषा आणि समाज” या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मिसाळ यांनी मराठी भाषेचे ऐतिहासिक महत्त्व, उगम व विकास, तिची समृद्ध परंपरा तसेच आधुनिक काळात भाषेच्या जतन व संवर्धनाची गरज यावर सखोल विवेचन केले. संत साहित्य, ग्रामीण व दलित साहित्य, लोकसाहित्य तसेच आधुनिक मराठी साहित्याचा त्यांनी आढावा घेतला. २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या संधी व जबाबदाऱ्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने व अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता गायके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अमोल दहातोंडे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. दत्ता कोकाटे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेचा अभिमान वाढवणारे व संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे हे व्याख्यान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.


