बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शालेय जिवनापासुनच दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावा, शालेय पाठ्यपुस्तके हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. हा पाया पक्का करा. जिद्द चिकाटी, सातत्य आणि संयम ठेउन अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते, असे प्रतिपादन सहाय्यक विक्रीकर आयुक्त पुजा शिंदे यांनी केले. तक्षशिला ज्युनिअर काॕलेज मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी पुजा शिंदे बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. विजय कदम होते. यावेळी बोलताना विजय कदम म्हणाले, ‘भारतामध्ये उज्वल ज्ञान परंपरा अस्तित्वात आहे. तक्षशिला विद्यालय ह्या ज्ञानीपरंपरेमध्ये राहून शिक्षण देण्याचे काम करत आहे. पदवी पेक्षा ज्ञान महत्त्वाचे मानून शिक्षण घेतले तर आयुष्यात निश्चितपणे यश मिळेल.
याप्रसंगी इयत्ता नववी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी इयत्ता दहावीचे विद्यार्थी पितळे भावेश, कोळपे प्रीती तसेच इयत्ता बारावीचे विद्यार्थिनी दारकुंडे अंजली, तांबे प्रियंका, लाडके वैष्णवी व तांबे सृष्टी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनी मुंगसे सुप्रिया विजय व देवकाते ऋतुजा दादासाहेब यांनी केले तर आभार अकरावीचा विद्यार्थी काळे ओंकार रवींद्र यांनी मानले. यावेळी प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्य मयुरी पवार, समन्वयक कल्पना पवार यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालय सोडताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांनी विद्यालयाला विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपले ऋण व्यक्त केले.


