जनशक्ती (वृत्तसेवा)- त्र्यंबकेश्वर येथे आगामी २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी केवळ कागदावर न राहता ती आता प्रत्यक्षात जमिनीवर उतरत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणारा प्रत्येक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोच, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन शिर्डीतील नियोजनाला नाशिकइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई सभागृहात नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली उच्चस्तरीय आढावा बैठक प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनाची व दूरदृष्टीची साक्ष देणारी ठरली. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत रस्ते, हवाई वाहतूक, रेल्वे, पाणीपुरवठा व गर्दी व्यवस्थापन या विषयांवर झालेली सखोल चर्चा व नियोजन शिर्डीच्या पायाभूत सोयी – सुविधा बळकटी प्राप्त करून देणार असून नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी ठरणार आहे. कुंभमेळ्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असते. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा या बैठकीच्या केंद्रस्थानी होता. सध्या ताशी १८० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानतळाची क्षमता नवीन टर्मिनलमुळे ४०० पर्यंत वाढणार आहे.
मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२६ ही मुदत सांगितली असता, ती कुंभमेळ्याच्या दृष्टीने उशिराची ठरत असल्याने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ती अमान्य केली. प्रशासनाने कंत्राटदार व एमएडीसीची चर्चा करून हे काम कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. दुसरीकडे, रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने ‘कोपरगाव पॅटर्न’ स्वीकारावा, असा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. शिर्डी हे रेल्वेचे अंतिम स्थानक असल्याने तिथे गाड्या वळवण्यासाठी लागणारा वेळ व मर्यादित फलाट संख्या लक्षात घेता, लांब पल्ल्याच्या गाड्या कोपरगाव स्थानकावर थांबवून तिथून बसेसद्वारे भाविकांना शिर्डीत आणण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यासाठी एस.टी. महामंडळाने कंबर कसली असून, दररोज ६८० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी ‘शिर्डी ते त्र्यंबकेश्वर’ अशी थेट बस सेवा सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी एस.टी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना दिल्या.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत तडजोड न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. शिर्डी – राहाता बायपासच्या चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्वतः पाहणी करणार असून, कामात त्रुटी आढळल्यास ते काम पुन्हा करण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांनी यावेळी सूचित केले. नगर – मनमाड या ७४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कुंभमेळ्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे गर्दी नियंत्रण. यासाठी शिर्डीत प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शहरातील सर्व पार्किंग झोन्स, वाहतूक मार्ग व पिकअप पॉईंट्स ‘गुगल अर्थ’च्या ‘केएमएल’ मॅपिंगद्वारे निश्चित केले जात आहेत, जेणेकरून नियोजनात अचूकता येईल. शहरात प्रवेश करण्यापूर्वी १५ किलोमीटर आधीपासूनच मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमधील दिशादर्शक फलक लावले जातील. हे फलक रात्रीच्या वेळीही स्पष्ट दिसतील अशा ‘रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह’ स्वरूपाचे असतील. विशेष म्हणजे, कोणत्या पार्किंगमध्ये किती जागा शिल्लक आहे, हे सांगण्यासाठी शहराच्या वेशीवरच ५ ठिकाणी ‘व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले’ म्हणजेच डिजिटल स्क्रीन्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांची होणारी फरफट थांबेल व वाहतूक कोंडी टळेल. प्रशासनाने केवळ पर्वणीच्या (शाही स्नान) दिवसांचा विचार न करता, सामान्य दिवसांसाठी वाहतुकीचे लवचिक धोरण अवलंबले आहे. गर्दी नसताना भाविकांना थेट मंदिर परिसरापर्यंत वाहने नेण्याची मुभा देणे व आवश्यकतेनुसार फलक झाकण्याची व्यवस्था करणे, हे या ‘स्मार्ट’ नियोजनाचे वैशिष्ट्य आहे.
मूलभूत सुविधा : पाणी, वीज व स्वच्छता भाविकांच्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शिर्डीची वाढती तहान भागवण्यासाठी ‘निळवंडे’ धरणाच्या कालव्यावरून अतिरिक्त पाणी उचलण्याचे नियोजन असून, टँकरमुक्त पुरवठ्यासाठी पार्किंग क्षेत्रात पाईपलाईनचे जाळे विणले जाणार आहे. स्वच्छतेसाठी आगळावेगळा निर्णय घेत, पार्किंगमधील प्रचंड कचरा उचलण्यासाठी घंटागाडीऐवजी थेट ट्रॅक्टरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी ५०० अतिरिक्त सफाई कामगारांची फौज तैनात असेल. अखंडित वीज पुरवठ्यासाठी कोपरगाव सबस्टेशनला पर्याय म्हणून बाभळेश्वर येथून ६ किलोमीटरची स्वतंत्र ‘बॅकअप लाईन’ टाकली जात आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी १४ अग्निशमन बंब व १४० प्रशिक्षित जवानांची मागणी नाशिकच्या प्रस्तावासोबत करण्यात आली आहे. मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी १४ तात्पुरते टॉवर्स व ५ फिरते टॉवर्स उभारून कनेक्टिव्हिटीचे जाळे अधिक घट्ट केले जाणार आहे.
‘शनिशिंगणापूरसाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा : शनिशिंगणापूरसाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा
कुंभमेळ्याच्या काळात शिर्डीसोबतच श्री क्षेत्र शनि – शिंगणापूर येथेही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने शनि – शिंगणापूरसाठीही स्वतंत्र ‘वाहतूक व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्यात आला आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डी या तीनही प्रमुख मार्गांवरून येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी ‘आउटर पार्किंग’ (P1 आणि P2) ची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या जवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी खाजगी वाहने या बाहेरील वाहनतळांवरच थांबवण्यात येतील. तेथून भाविकांना मंदिराकडे नेण्यासाठी विशिष्ट ‘पिक – अप व ड्रॉपिंग पॉइंट्स’ निश्चित करण्यात आले आहेत. सोनई, घोडेगाव व राहुरी या भागातून येणाऱ्या वाहतुकीचा विचार करून प्रवेश व निर्गमन मार्ग अशा प्रकारे आखले आहेत की, जेणेकरून महामार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही. दर्शन रांगेतील भाविकांचा ओघ सुरळीत राहील.


