नेवासा तालुक्यातील शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; शिक्षिका व विद्यार्थी जखमी 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील शहाली पिंप्री येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवारी (ता.१२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर ओतूर परिसरात भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एक शिक्षिका व सुमारे १० ते १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शहाली पिंप्री जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी येत होते. दरम्यान, ओतूरजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.या अपघाताची माहिती मिळताच शहाली पिंप्री गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, शहाली पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ते सातवी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुरुवारी पहाटे शिवनेरी, लेण्याद्री,ओझरला जाण्यासाठी निघालेली असताना या बसला ओझरजवळ अपघात झाला. या अपघातात सुमारे १४ जण जखमी झाले असून जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाला डुलकी लागल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती. या बसचे टायर फुटून बसने पलटी घेतल्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. अपघातग्रस्तांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सरपंच सतिष चंदन यांनी दिली.