तांबे वस्ती शाळेच्या वतीने नूतन केंद्रप्रमुखांचा गौरव; सेवानिवृत्त शिक्षकांना निरोप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती च्या वतीने नूतन केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब यांचा सत्कार आणि सेवानिवृत्त होत असलेल्या भाऊसाहेब सावंत या शिक्षकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. शिक्षकी पेशातील समर्पण आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते. तर प्रास्ताविक देविदास कचरे सर यांनी केले. यावेळी नवनियुक्त केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेच्या गुणवत्तेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
तसेच दीर्घकाळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सेवानिवृत्त होत असलेले शिक्षक भाऊसाहेब सावंत सर यांचाही यावेळी जंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, तर तो समाजाचा मार्गदर्शक म्हणून सदैव कार्य करत राहतो, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मा. प्राचार्य मुरलीधर दहातोंडे सर यांनी हे दोन्ही माझे विद्यार्थी असून यांचा सोहळा पाहताना माझे अंतकरण भरून आले हीच माझी कमाई आहें म्हणत सेवानिवृत्त शिक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नूतन केंद्रप्रमुखाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला सरपंच चंद्रकांत मुंगसे, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे, ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,चांगदेव महाराज तांबे, रघुनाथ कुटे पुढारी, शिवाजी बनसोडे, कचरू तांबे, निवृत्ती तांबे, अशोक तांबे, अमोल तांबे, व्हाईस चेअरमन जनार्दन देशमुख, जनार्दन महाराज तांबे, बंडू तांबे, ग्रामपंचायत सदस्य अंबादास तांबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिषेक घटमाळ सर यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे मुख्याध्यापक देविदास कचरे सर व सहशिक्षक संदीप नांगरे सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत विशेष परिश्रम घेतले.