बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती देडगाव येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जयंतीनिमित्त सकाळी गावातील बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्रिशरण-पंचशील ग्रहण केले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा नेते निलेश कोकरे, अँड. अजित पठाण व राजेंद्र ससाणे यांनी आपले मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावेळी केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. निळ्या ध्वजांनी आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी, फटाक्याच्या आतषबाजीने संपूर्ण देडगाव परिसर निळाशार झाला होता. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. केवळ जल्लोषच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत शांततेत यावर्षी काही विशेष उपक्रम राबवण्यात आले.
या सोहळ्यासाठी देडगावमधील उपसरपंच आनंद दळवी, चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी उपसरपंच दत्ता मुंगसे, वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट, उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक जावळे, संभाजी टकले, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, पोपट मुंगसे, विश्वास हिवाळे, रेकत पठाण, अण्णा हिवाळे, फकीरचंद हिवाळे, आशिष हिवाळे, नितीन हिवाळे, दादा एडके, सचिन हिवाळे, प्रकाश दळवी, अबालवृद्ध, महिला आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी समस्त बहुजन कमिटी व भिमक्रांती ग्रुप देडगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

