‘मुळा, वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर’ कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)-  जिल्ह्यात विधान परिषद सुरू निवडणुकीची धामधूम असतानाच, तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही लागला आहे. ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी आजपासून (दि.२६) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नेवासा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी राजकीय बॉयलर पेटले आहेत. यामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील मुळा सहकारी साखर कारखाना, आमदार मोनिका राजळे यांच्याशी निगडित वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या तिन्ही कारखान्यांसाठी आजपासून अर्ज स्वीकृती सुरू होणार आहे. यापैकी मुळा आणि वृद्धेश्वरसाठी २६ जून रोजी मतदान आणि २७ जूनला मतमोजणी होणार आहे. ज्ञानेश्वर कारखान्यासाठीही आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असली तरी या कारखान्याचे मतदान दि. २७ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल आणि २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे काम पाहत असून, प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे हे जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.