जनशक्ती (वृत्तसेवा)- श्री क्षेत्र नेवासा येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. १०) रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी घोडेगावसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पालखीच्या आगमनाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. घोडेगाव व परिसरातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा व लेझीम पथकांच्या आकर्षक सादरीकरणातून पालखी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वादनाने आणि लेझीमच्या तालबद्ध सादरीकरणाने स्वागत सोहळ्याला विशेष रंगत आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन माऊलींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
दिंडीतील वारकऱ्यांसाठी घोडेश्वरी माध्यमिक विद्यालय येथे मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव सोनवणे व त्यांच्या परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सोनवणे परिवाराच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा येथील ह.भ.प. देविदास महाराज मस्के यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून संतपूजन करण्यात आले.
घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासक श्री. सवई व ग्रामसेवक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही.
याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, हर्षदाताई काकडे, मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, सोनई पोलीस ठाण्याचे मोरे साहेब, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध मान्यवरांनी पालखी सोहळ्यास भेट देऊन संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.
पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अहिल्यानगर पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली. या पथकात पीएसआय अंबादास हुलगे, दिनेश पळसकर, संजय येठेकर, अजय कदम, सुभाष पठारे, शरद वर्पे आणि युवराज पवार यांचा समावेश होता. तपासणीनंतर पथकातील अधिकाऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेऊन संपूर्ण विश्वात शांतता, सुख-समृद्धी आणि बंधुभाव नांदावा, अशी प्रार्थना केली.
सायंकाळी सुमारे चार वाजता घोडेगावकरांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पालखी सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला. या प्रसंगी ग्रामस्थ, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


