बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे शिवारात असलेल्या पावन महागणपती देवस्थान येथील सांस्कृतिक भवनाची उभारणी पूर्ण झाली असून, या भवनाचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवारी दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता माजी मंत्री शंकरराव गडाख आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे राहणार आहेत. श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक भवनासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये, तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या लोकार्पण सोहळ्यास माजी मंत्री शंकरराव गडाख आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महालक्ष्मी हिवरेचे सरपंच भगवानराव गंगावणे, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माका गावचे सरपंच अनिलराव घुले, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, पावन महागणपती देवस्थानचे सर्व विश्वस्त, सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.

