श्री पावन महागणपती देवस्थान येथे लोकसहभागातून संत भवन उभारणीचा संकल्प; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव, माका, पाचुंदा व मलहिवरा या चार गावांतील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून पावन महागणपती देवस्थान येथे संत भवन उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, चारही गावचे मान्यवर एकत्र येत संत भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश मंडप या हॉलमध्ये देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात देवस्थानचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे बोलताना म्हणाले की,
पावन महागणपती देवस्थान हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, या देवस्थानाला नेहमीच विविध ठिकाणांहून साधुसंत, महंत व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर भेट देत असतात. देवस्थानात येणाऱ्या साधुसंतांच्या निवासाची योग्य व्यवस्था व्हावी, त्यांना मुक्कामादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने संत भवनाची आवश्यकता अनेक दिवसांपासून जाणवत आहे, अशी सूचना मांडली. तर या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष हिवरा गावचे सरपंच भगवानराव गंगावणे यांनी भाविकांना एकत्र येत अशा उपक्रमाचे स्वागत करून सर्वांनी आर्थिक हातभार लावावा व भव्य असे संत भवन उभारू अशी ग्वाही देत आर्थिक स्वरूपाच्या मागणीचे आवाहन केले.
तर कायदेविषयक तज्ञ अँड. गोकुळ भताने यांनी 51 हजार रुपये देत संत भवनाच्या उभारणी साठी मोलाचा हातभार दिला. व संत भवन होईपर्यंत मी कार्यक्षम राहील असे आश्वासन दिले.
ही गरज ओळखून देडगाव, माका, पाचुंदा व म.ल.हिवरा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून संत भवन उभारण्याचा स्तुत्य संकल्प केला. या संकल्पाच्या पूर्ततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकत भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
ग्रामस्थांची एकजूट, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन या उपक्रमातून घडले. संत भवनाच्या उभारणीमुळे भविष्यात देवस्थानात येणाऱ्या साधुसंतांची निवासाची उत्तम सोय होणार असून, देवस्थानच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याला नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे,ह भ प अखिलेश महाराज गोयकर,मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम,नारायणराव वाघमोडे, ह भ प बंडू महाराज वाढेंकर, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे, राजाराम महाराज मुंगसे,गायनाचार्य पांडुरंग महाराज रक्ताटे, चेअरमन सागर बनसोडे, व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख,माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे,माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे,बन्सी पाटील मुंगसे, बाळासाहेब कुटे, चांगदेव महाराज तांबे, महादेव देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कदम, विश्वस्त अरुण वांढेंकर,हरिभाऊ देशमुख, बालाजी देवस्थानचे माजी विश्वस्त सुनील शेठ मुथ्था, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे, बन्सी आप्पा मुंगसे,आदिनाथ कुटे, भाऊराव टांगळ अनमोल कष्ट घेऊन योग्य नियोजन करत आहेत. या उपक्रमाचे परिसरातील भाविक व ग्रामस्थांकडून स्वागत आणि कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आभार माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी मानले.