जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि अमवस्या निमित्त भाविकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. या काळात सुमारे सात लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी अमावस्याच्या असल्याने चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते. तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पु. ना. गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी १० तोळे सोने दान केले.
शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेली दर्श अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत असल्याने शुक्रवारी सायंकाळपासून भाविकांनी शनीदर्शन घेतले. शनिवारी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. देवस्थाने राहुरी, घोडेगाव, संभाजीनगर मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी शिंगणापूर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर खाजगी जागेत वाहनतळ तयार केले होते. पण शनिवारी दुपारपर्यंतच वाहनतळ हाऊसफुल झाल्याने वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आली. तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या
रांगा लागलेल्या होत्या.
खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, आमदार श्वेता महाले, आमदार हिकमत उधाण, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी
शनीअभिषेक करून शनीदर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मंडपाची सावली, आरोग्य, पिण्याचे पाणी, मॅट रुग्णवाहिका, हरवले-सापडले, आरोग्य सुविधा आदी पुरविण्यात आल्या होत्या.
शनिवारी दिवसभर दिल्ली, मुंबई व हरियाणा येथील भाविकांसह अनेक शनिभक्तांनी अन्नदान केले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्त मंडळ कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिवसभर मंदिर परिसरात आलेल्या भाविकांचे स्वागत केले. शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
